परळी

सत्ताधारी मंत्री शेतकर्‍यांकडे साधे ढुंकूनही पाहत नाहीत, मंत्र्यांनो, बीडचे दौरे करतांना जरा शेतकर्‍यांचाही विचार करा, पंकजाताईंचा घणाघात, मुंडे भरपावसात पोहोचल्या अतिवृष्टी बाधित गावात, चिखल तुडवत केली नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी; शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा दिला शब्द, पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही भरपाई द्या


परळी, दि. 28 (लोकाशा न्यूज) : मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या तालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकर्‍यांना त्यांनी धीर झाला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे. ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील हे विदारक चित्र पाहून पंकजाताई मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखल तुडवत त्यांनी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. बीड जिल्हयातील शेतकरी सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्ह्यात येऊन गेले पण ते शेतकर्‍यांसाठी कुठेही गाडीतून खाली उतरल्याचे दिसले नाही, ते शेतकर्‍यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मंत्र्यांनी राजकीय दौरे करतांना इथल्या शेतकर्‍यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जोरदार पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकर्‍यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!