अंबाजोगाई

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्वाराती रुग्णालयासाठी एक हजार खाटा मंजूर करा आ. नमिता मुंदडांची ना. अमित देशमुखांकडे मागणी


अंबाजोगाई, दि. 18 (लोकाशा न्यूज) : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. दिवसागणिक येथे दाखल होणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. परिणामी सध्याच्या 518 खाटा कमी पडत असून जमिनीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही विदारक परिस्थिती दूर करण्यासाठी स्वाराती रुग्णालयासाठी तातडीने एक हजार खाटा मंजूर करून त्यानुसार आवश्यकते प्रमाणे डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ व इतर कर्मचार्‍यांची पदे भरण्यात यावीत अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. स्वाराती रुग्णालयातील विविध अडचणी संदर्भात बुधवारी (दि.17) आ. मुंदडा यांनी ना. अमित देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयावर बीडसह तीन जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण अवलंबून आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण येत आहे. प्रत्येक वार्ड रुग्णांनी खचाखच भरला असून डॉक्टर्स, नर्स यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी मंजूर खाटा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, रुग्णालयातील शल्य चिकित्सा विभागाच्या इमारतीवर आणखी एक मजला बांधणे आवश्यक असून त्यासाठी मंजुरी आणि निधी द्यावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी केली आहे. रुग्णालयात डायलेसिस मशीन कार्यान्वित आहेत, परंतु त्यासाठी तज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. या विभागाच्या गरजेनुसार पदे भरण्यात यावीत. रुग्णालयासाठी कार्डियाक रुग्णवाहिका अत्यावश्यक असून ती देण्यात यावी. रुग्णालयात परिसरातील ड्रेनेज व्यवस्था खूप जुनी झाली असल्याने नव्य ड्रेनेज व्यवस्थेसाठी त्वरित अंदाजपत्रक तयार करून त्यास मंजुरी द्याव्वी. अंबाजोगाई परिसरात कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबईला जावे लगते. त्यामुळे या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी स्वाराती रुग्णालयातील कोबाल्ट युनिट पुन्हा सुरु करण्यात यावे अशा मागण्या देखील आ. नमिता मुंदडा यांनी ना. अमित देशमुखांकडे केल्या आहेत.

कॅथलॅबसाठी निधी द्या

हृदयविकाराच्या रुग्णांची मोठी संख्या असतानाही अंबाजोगाई व परिसरात कॅथलॅबची सोय नाही. येथील रुग्णांना आर्थिक क्षमता नसताना देखील कॅथलॅबसाठी नाईलाजाने मोठ्या शहरात जाऊन महागडे उपचार करून घ्येव लागता. त्यामुळे स्वाराती रुग्णालयातच अद्यावत कॅथलॅब उभारण्यात यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. मुंदडांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!