केज

अवैध धंद्यावाल्याना एसपींचे दणक्यावर दणके सुरूच ! केज तालुक्यातील जुगार अड्डयावर एपीआय विलास हजारेंचा छापा, 20 जणांवर गुन्हा दाखल; 7 लाख रुपयांचे साहित्य जप्त


केज, दि. 29 : तालुक्यातील केकतसारणी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गुरूवार (ता.२८) रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने एकूण सात लाख पन्नास हजार सत्तर रूपयांचे साहित्य जप्त करून वीस जुगार खेळणाऱ्यांवर शुक्रवारी सकाळी सहा वाजता पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे तालुक्यातील अवैधरित्या जुगार चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ‌तालुक्यातील केकतसारणी शिवारात रामधन करांडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून पत्याचा जूगार अड्डा सुरू होता. याची गुप्त माहिती मिळताच पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने गुरूवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सापळा रचून अचानक जुगार अड्डयावर छापा टाकला.

यावेळी राजाभाऊ आकुसकर (रा.आडस ता.केज), बाळासाहेब राऊत (रा.चिंचोलीमाळी, ता. केज), लहु वाघमारे (रा.आडस), किसन जाधवर (रा. रत्नापुर ता.कळंब), महादेव मस्के (रा.भिमनगर ता.केज), श्रीराम केकाण (रा.केकाणवाडी), अमोल शेप (रा. लाडेवडगाव), बालासाहेब गालफाडे (रा. चिंचोलीमाळी), बाजीराव अंडील (रा. पाहाडी पारगाव), कलीम सय्यद (रा.अजीजपुरा केज), सिलवंत शिंदे (रा. लाडेवडगाव), सुरेश माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), संतोष येवले (रा.मादळमोही ता. गेवराई), अरुण माने (रा. ब्रम्हणपुर ता.बीड), कलीम शेख (रा. कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर), दिलीप खरचन (रा. आखेगाव, ता.शेवगाव जि.अहमनगर), विष्णू ढोले (रा. आडस, मराठागल्ली आडस), गोरख वायबसे (रा. कासारी, ता. केज), अशोक उजगरे ( रा.आसरडोह ता.धारुर) व चरणदास काळे (रा.उमरत पारगाव ता.जि.बीड) हे वीस जण फेक पत्ता (झन्ना-मन्ना) नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

यावेळी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी झाडा-झडती घेतली असता रोख-एक लाख एक्केवीस हजार सत्तर रूपये, वाहणे-पाच लाख चाळीस हजार, भ्रमणध्वनी संच- अठ्याऐंशी हजार पाचशे रूपये असे एकूण सात लाख पन्नास हजार सत्तर रूपयाचे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी सहा वाजता युसुफवडगाव पोलीस ठाण्यात वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. कांदे करीत आहेत.

या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील जुगार अड्डे चालकात एकच खळबळ उडाली आहे. मात्र तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याकडे स्थानिक पोलीसांचे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!