केज

‘त्या’ तरुणाचा खून करून प्रेत आणून टाकले ! माळेगाव येथील घटना ; अज्ञातांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल


केज, दि.17 : केज- कळंब राज्य रस्त्यावरील माळेगाव येथील गहू पिकाच्या शेतात सावरगाव ( ता. कळंब जि. उस्मानाबाद ) येथील लखन महादेव सोनवणे ( वय 24 ) तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता. या तरुणाचा डोक्यात अज्ञात वस्तूने आघात करीत अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे उत्तरीय तपासणीत उघडकीस आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
माळेगाव येथील शेतकरी तुकाराम गुंठाळ यांच्या केज – कळंब रस्त्यालगत असलेल्या सर्वे नं. 41 मधील शेतातील पेरूच्या बागेजवळील गव्हाच्या पिकात सावरगाव ( ता. कळंब जि. उस्मानाबाद ) येथील लखन महादेव सोनवणे ( वय 24 ) या इमारतीचे रंगकाम करणार्‍या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे प्रभारी श्री. पालवे, फौजदार सीमाली कोळी, पोलीस नाईक बालासाहेब ढाकणे, शामराव खनपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस नाईक वैभव राऊत, सचिन अंहकारे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला होता. तर त्या तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूने मार लागल्याचे आणि पाठीवर व मानेवर मारहाणीच्या पुसटशा खुणा व कानातूनही रक्त आल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे त्या तरुणाचा घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात होता. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून लखन सोनवणे याच्या डोक्यात काही तरी वस्तूने मारहाण करून जखमी करीत त्यास जीवे मारून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हा सदर शेतात आणून टाकल्याची तक्रार मयत लखन याचा भाऊ सतीश महादेव सोनवणे यांनी युसुफवडगाव पोलिसात दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सीमाली कोळी ह्या पुढील तपास करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!