गेवराई : लोकाशा न्युज : गोदापात्रात वाळू माफियांकडून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याबाबत गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने सापळा रचून तालुक्यातील हिंगणगाव गोदापात्रात छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील गोदापात्रात सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत पोलीस प्रशासनाकडे येत असलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नीलकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या पथकाने सापळा रचत दि.२६ रोजी साध्या वेशात पिकअप मध्ये बसून जात हिंगणगाव येथील गोदापात्रात छापा टाकला पोलिस येत असल्याचे दिसताच याठिकाणांहून वाळू माफियांनी धूम ठोकली. दरम्यान याठिकाणी दोन ट्रॅक्टर व चार केन्यासह असा एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील मुद्देमाल ट्रॅक्टरमध्ये घालून गेवराई पोलीस ठाण्यात आणून पो.नाईक गणेश तळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात चोरी व गौणखनिज अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निलकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या पथकाचे सपोनि राजाराम तडवी,पो.ना.शरद बहिरवाळ,परमेश्वर तागड, अंकुश वरपे, नारायण खटाने, प्रधान, अमोल खटाने यांनी केली. तर पोलीस प्रशासनाच्या या कारवाईने वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.