देश विदेश

तूर्तास काँग्रेसचं नेतृत्व सोनिया गांधींकडेच

दिल्ली, दि.24 (लोकाशा न्युज) ः दिवसभर चर्चेत असलेली काँग्रेस कार्यसमितीची बैठक अखेर संपली. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर झालेली ही बैठक वादळी ठरली. सात तास चाललेल्या या बैठकीत नवीन अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली. अखेर चर्चेअंती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी राहणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार असून, तोपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व निवड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज (२४ ऑगस्ट) काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सुरूवातीलाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पद सोडण्यास तयार असल्याचं सांगत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती कार्यसमितीकडे केली. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिलेल्या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना सुनावलं. त्याचबरोबर हे पत्र भाजपाला पूरक असल्याचा आरोपही बैठकीत झाला. त्यावरून दुपारी बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याबरोबर पुढील सहा महिन्यात नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तोपर्यंत हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील असा ठरावही मंजूर करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!