केज

बावीस वर्षीय तरूणाची आत्महत्या; हातचे काम गेल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल


केज, दि. 8 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आडस येथील राघू उत्तम काळे (वय-22) या तरूणाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. कामानिमित्त बाहेरगावी गावी असलेला हा तरूण लॉकडाऊन काळात गावी आला होता. त्याने कुटूंबात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील आडस येथील राघू काळे हा घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने गोवा राज्यात कंपनीत कामाला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कंपनी बंद करण्यात आली. हाताला काम नसल्याने त्याला गावी येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावी येऊन तीन-चार महिन्याचा कालावधी झाला होता. तो कांही दिवसांनंतर परत जाण्याच्या तयारीत होता. मात्र बुधवारी त्याचा कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे राग सहन न झाल्याने रात्री उशीरा साडेअकराच्या गावातील बाजार समितीच्या उपबाजारपेठेत सुरू असलेल्या बांधकामात स्वत:च्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली. घरच्या लोकांनी रागाने गेलेल्या मुलांचा शोध घेतला असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती पोलीसांना देताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. त्याच्या मृतदेहावर गुरूवारी दुपारी दोन वाजता अंबाजोगाई रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!