राजकारण

महाराष्ट्रात मध्यावधीची शक्यता ? अनेकांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं आताच का?

मुंबई: राज्य सरकार स्थिर आहे. मजबूत आहे. आघाडीला कोणताही धोका नाही, असं महाविकास आघाडीचे नेते कितीही सांगत असले तरी सध्याची हवा मात्र काही औरच सांगत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटलांपासून ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंतचे सर्वच नेते मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार की काय? असंच चित्रं निर्माण झालं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगली येथे एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मीही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहतोय असं सांगून जयंत पाटलांनी आपणही मुख्यमंत्रीपदाचे भविष्यातील दावेदार असल्याचं नमूद केलं. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अत्यंत चलाखीने प्रतिक्रिया देऊन हा विषय कसा संपेल यावर भर दिला. त्यानंतर जयंत पाटलांनी सारवासारव करून मी तसे म्हणालोच नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर जयंतरावांनी लगेचच राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेची घोषणा करून संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचं जाहीर केलं. जयंत पाटलांचं मुख्यमंत्रीपदाचं विधान आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा या दोन गोष्टी आता राजकीय विश्लेषक जोडून पाहत आहेत. राष्ट्रवादी नंबर वनचा पक्ष होण्यासाठी कामाला लागली आहे, त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा त्याचा अर्थ काढला जातोय. दुसरा अर्थ राष्ट्रवादीला भविष्यात मुख्यमंत्रीपदावर दावा करायचा आहे, त्यामुळेही राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू असल्याचंही सांगितलं जातंय. तर, तिसरी शक्यता म्हणजे राज्यात मध्यावधी होणार काय? ही शक्यता पचनी पडणारी नाही. पण नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि कृती या बोलक्या असल्याने या शक्यतेलाही हवा मिळाली आहे.

पंकजांकडून रिमाइंडर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आज एक ट्विट करून आपल्याच सरकारला आपल्याच आश्वासनाची आठवण करून दिली आहे. 2021मध्ये जनगणना होणार असून त्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा एक 18 मिनिटाचा व्हिडीओही अपलोड केला आहे. पंकजा यांच्या या राजकीय कृतीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. या मागणीच्या माध्यमातून ओबीसीच्या नेत्या म्हणून त्यांना जम बसवायचा आहे. राष्ट्रीय पातळीवर ओबीसींच्या नेत्या म्हणून उभं राहण्यासाठी पंकजा यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं सांगितलं जातंय. तसेच पंकजा यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा सर्वश्रूत आहे. ओबीसी व्होटबँक निर्माण करून भविष्यात भाजपमध्येच मुख्यमंत्रीपदासाठी दबाव निर्माण करण्याची पंकजा यांची ही खेळी तर नाही ना? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वडेट्टीवारांचे संकेत काय?

आज जालन्यात ओबीसींचं मोठं आंदोलन होतं. या आंदोलनाला मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. यावेळी सभेमध्ये आगामी मुख्यमंत्री ओबीसीच हवा म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती. या मोर्चात आता मुख्यमंत्री ओबीसींचाच असं लिहिलेली पोस्टर्सही झळकली होती. त्यामुळे वडेट्टीवार यांनीही पुढचा मुख्यमंत्री ओबीसीच हवा असं सांगून मुख्यमंत्रीपदासाठी आपलाही दावा ठोकला आहे. वडेट्टीवार गेल्या काही दिवसांपासून अचानक सक्रिय झाले असून आता तर त्यांनी ओबीसी मुख्यमंत्रीपदाचीच मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत की काय? असं वातावरण निर्माण झालं आहे.

आठवलेंचं भान

जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही भाष्य केलं असलं तरी रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मात्र या सर्व नेत्यांना वास्तवाचं भान दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्रीपदाची मागणी जशी ओबीसींची आहे. तशी दलितांची आहे. ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि मीही मुख्यमंत्री व्हावं असा मला वाटतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते होऊ देणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं आहे. ठाकरे यांच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे ते कुणालाही मुख्यमंत्रीपदी बसवणार नाहीत, असंच आठवलेंना यातून सूचवायचं आहे.

मध्यावधीचे वारे?

मुख्यमंत्रीपदावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि कृती पाहता सध्याचं हवा ही मध्यावधीचीच असल्याचं वातावरण आहे. पण त्यात कितपत तथ्य आहे, हे आगामी काळातच दिसून येईल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!