राजकारण महाराष्ट्र

नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसची फुली?; वाचा, काय आहे अंदर की बात?

मुंबई: काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत असलेले विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाचीही मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची निवड तूर्तास स्थगित करण्यास हायकमांडला भाग पाडल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे.

 काँग्रेस हायकमांडने विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाचा भार काढून तो नाना पटोले यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला होता. पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल आणि ते पक्षाला भरपूर वेळ देऊ शकतील या हेतूने पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात येणार होती. थोरात हे विधानसभेतील पक्षाचे गट नेते आहेत. राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. थोरात यांच्यावर तीन तीन जबाबदाऱ्या असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाला न्याय देऊ शकत नसल्याची हायकमांडची भावना होती. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षाचा वेगाने विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या होत्या.

पटोलेंना हवय ऊर्जा किंवा सार्वजनिक खातं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. त्यांच्या नियुक्तीपत्रावर सोनिया गांधी यांनी सहीही केली आहे. मात्र पटोले यांनी ऐनवेळी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची मागणी केली. ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रिपद देण्याची मागणी पटोले यांनी केली. पटोले यांनी ऐनवेळी केलेल्या या मागणीवर सोनिया गांधीही आश्चर्यचकीत झाल्या. त्यामुळे त्यांनी पटोले यांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड रखडली गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू

काही सूत्रांच्या मते, काँग्रेस हायकमांड यांना आपल्या पदाला न्याय देईल आणि प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका योग्यरितीने पार पाडेल असा नवा प्रदेशाध्यक्ष हवा आहे. इतर कोणतीही जबाबदारी न घेता फक्त प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी पार पाडेल, अशा प्रदेशाध्यक्षाची केंद्रीय नेत्यांना गरज आहे. मात्र, पटोले यांनी दुर्देवाने त्यांची आणखी एक मागणी वाढवली. त्याचा हायकमांडलाही आश्चर्याचा धक्का बसला, असं सूत्रांनी सांगितलं. आता नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांनीही कामाला सुरुवात केली आहे. पक्षाच्या प्रत्येक आमदाराशी वन-टू-वन चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यास पटाील यांनी सुरुवात केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!