Uncategorized

डीसीसीच्या प्रशासकिय मंडाळाला
पुन्हा सहा महिण्यांची मुदतवाढ


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गतवर्षी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय प्रशासकीय मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी सु.ल. काठोळे यांनी बुधवारी (दि.13) या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. येत्या 5 ऑक्टोबर पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
या पाच सदस्यीय प्रशासक अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक हे असून उर्वरित सदस्यात शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि अ‍ॅड. अशोक कवडे यांचा समावेश आहे. गतवर्षी बँकेची निवडणूक झाल्यानंतर संचालक मंडळाचे कोरम पूर्ण न झाल्याने नवीन संचालक मंडळ स्थापित होऊ शकले नव्हते. त्यामुळे 7 एप्रिल 2021 पासून एक वर्षासाठी बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. मागील आठवड्यात 6 एप्रिल रोजी या प्रशासकीय मंडळाची मुदत संपली होती. त्यामुळे राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी सु.ल. काठोळे पूर्वीचेच सदस्य कायम ठेवत प्रशासकीय मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्च 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत 19 पैकी 11 जागा रिक्त राहिल्या होत्या. उर्वरित 8 पैकी 5 जागा राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनल, 1 जागा अपक्ष (राजकिशोर मोदी) तर प्रत्येकी 1 जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस समर्थकांना मिळाली. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याने हे संचालक मंडळ स्थापित करता येत नसल्याचे सहकार प्राधिकरणाने राज्य सरकारला कळविले होते. त्यामुळे, बँकेवर 5 सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. त्याच प्रशासक मंडळाला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!