बीड गेवराई

संतापजनक!; प्रसुतीच्या वेदना अन् महिला कर्मचाऱ्याचा बेजबाबदारपणा ; महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसूती

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील संतापजनक प्रकार ; कारवाईची नातेवाईकांची मागणी

तालुक्यातील मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका बाळाला रुग्णालयाच्या प्रांगणातच जन्म घ्यावा लागला. प्रसुतीच्या वेदना तिव्र होऊ लागल्याने संबंधीत महिला तेथील रुग्णालयात गेली, मात्र तेथील कर्तव्यावरील महिलेने तपासणी न करताच बीडला जा, म्हणून कर्तव्यात कसूर केला. नातेवाईकांनी विनंती करुनही संबंधीत महिलेला रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने सदरील महिलेची प्रसूती हि रुग्णालयाच्या उघड्या प्रांगणात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने यामध्ये बाळ व आई दोघे सुखरुप आहेत. मात्र यामध्ये काही हानी झाली असती तर, यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महिलेला रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने तिची उघड्यावर प्रसूती झाली असून मोठी अवहेलना झाली आहे, तरी आरोग्य केंद्रातील संबंधीत कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. तर या संतापजनक घटनेवरून तालुक्यातील आरोग्य सेवेचा अक्षरशः धिंधवडे उडाले आहेत.
गेवराई तालुक्यातील तांदळा येथील सुरेखा कृष्णा माळी या महिलेला मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आणले होते. मात्र तेथील कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता तुम्ही बीडला जा म्हणत जबाबदारी झटकली. यावेळी नातेवाईकांनी विनंती करुनही महिलेला आरोग्य केंद्रात दाखल न करुन घेतल्याने संबंधीत महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती झाली. हा संतापजनक प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर आरोग्य केंद्रात सर्व सोयी उपलब्ध असताना प्रसुतीसाठी आलेल्या या महिलेची तपासणी केली नाही, शिवाय अँडमिट करुन न घेतल्याने आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने बाळ-बाळंतीण सुखरूप आहे. मात्र या बेजबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी या महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी केली आहे.

उपचाराअभावी आरोग्य केंद्राच्या दारात बाळाला जन्म
केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती मातांसाठी जननी शिशू सुरक्षा योजना सुरू केली आहे, मात्र या योजनेलाच मादळमोही येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हरताळ फासला आहे. या महिलेला केवळ उपचाराअभावी आरोग्य केंद्राच्या दारात बाळाला जन्म द्यावा लागला. प्रसुती झालेल्या सुरेखा माळी यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात येईपर्यंत सुरेखा यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी तिथे डय़ुटीवर असलेल्या वैद्यकीय महिला कर्मचाऱ्याने जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. रात्री लवकर गाडी उपलब्ध न झाल्याने या गोंधळात सुरेखा यांची प्रकृती फारच बिघडत होती. त्यांना असहय़ वेदना होत होत्या. शेवटी असह्य वेदनासह आरोग्य केंद्राच्या दारातच सुरेखा यांची प्रसूती झाली. या प्रकाराने रुग्णासह नातेवाईकही हबकून गेले. सुदैवाने बाळ व मातेलाही इजा झाली नाही, मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधीत महिला कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे.

कर्तव्यात कसूर, रेफरवर दिला जातो भर
गेवराई तालुक्यातील आरोग्य केंद्रात नेहमीच आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजल्याचे दिसतात. कुठलेही गंभीर पेशंट रात्री रूग्णालयात आल्यानंतर पहिले रेफर करण्याचे प्रकार सातत्याने होताना दिसतात. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णांना तात्पुरती मलमपट्टी करुन त्यांना रेफर करुन आरोग्य केंद्रातील कर्मचारी आराम करताना दिसतात. मंगळवारी मादळमोहीत देखील असाच प्रकार घडला. यामध्ये आई किंवा नवजात बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर यास जिम्मेदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेकदा रुग्णवाहिकाही होत नाही वेळेवर उपलब्ध
शासनाकडून आरोग्यसेवेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. यामध्ये महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करुन ते प्रसूतीनंतर घरी पोहच करण्यापर्यंत सुविधा पुरविण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र अनेकदा ग्रामीण भागातील महिलांना टोलफ्री नंबरवर संपर्क करुनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते. रुग्णवाहिका हि संबंधीत रुग्णालयाच्या कोपऱ्यात अडोशाला लावली जाते. संपर्क केला तर दुसऱ्या पेशंटला घेऊन जात आहे, एक-दोन घंटे लागतील असे कारण समोरून सांगितले जाते. त्यामुळे नातेवाईक खाजगी वाहनांचा आधार घेत रुग्णालयात दाखल होतात. मात्र याठिकाणी देखील जबाबदारी झटकली जाते, याकडे मात्र आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आरोग्य केंद्रात कर्तव्यावरील कर्मचारी कुचराई करताना दिसतात, हे मादळमोही येथील घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!