बीड अंबाजोगाई

ऊसतोडणीला जाण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेच्या पोटावर मारल्या लाथा; तीन महिन्यांचे अर्भक दगावले; पती आणि सासूवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : तीन महिन्यांची गर्भवती असल्याने विवाहितेने ऊसतोडणीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला बेदम मारहाण केली. यावेळी पतीने पोटात लाथा मारल्याने विवाहितेच्या पोटातील तीन महिन्यांचे अर्भक दगावले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी तांडा येथे घडली. याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कविता बालाजी पवार (वय २१, रा. कुरणवाडी तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या पिडीत विवाहितेचे नाव आहे. एक वर्षापूर्वी तिचे लग्न बालाजी नामदेव पवार याच्यासोबत झाले. कविताच्या फिर्यादीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी तिला पती बालाजी आणि सासू सुमन यांनी ऊसतोडणीला सोबत चल म्हणून आग्रह धरला. परंतु, तीन महिन्यांची गर्भवती असल्या कारणाने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याने कविताने ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला मारहाण सुरु केली. यावेळी पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वदना होऊ लागल्या. त्यामुळे कविता एकटीच स्वाराती रुग्णालयात दाखल झाली. तपासणीआटणी तिच्या पोटातील तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने शनिवारी (दि.२७) ते मृत बाळ काढून टाकण्यात आले असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून तिचा पती आणि सासूवर कलम ३१६,३२३,३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक केंद्रे करत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!