बीड

किसनलालजी मुनोत यांचे संथारा व्रतात निधन; उद्या सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार

बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज)- येथील सुश्रावक श्री. किसनलालजी रतनलालजी मुनोत यांचे 30 सप्टेंबर 2021 गुरुवार रोजी सायंकाळी 9 च्या सुमारास जैन धर्मात पवित्र समजले जाणारे संथारा व्रतात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 85 वर्षे होते. मूळचे रायमोह निवासी स्व. किसनलालजी आपल्या इतर तीन भावंडांसह सुमारे 50 वर्षांपुर्वी व्यवसायाच्या निमित्ताने बीडला आले आणि कापड व्यवसायात स्थिरावले. अतिशय संघर्षमय परिस्थितीत व्यवसायातील सचोटी, ग्राहकांचा विश्‍वास व सातत्याच्या बळावर त्यांनी खूप मोठी प्रगती साधली आणि शहरातील हा व्यवसाय एका उंचीवर नेऊन ठेवला. एका विशिष्ट वेळी आपली मुले कर्तबगार व जबाबदार झाल्याची जाणीव होताच त्यांनी व्यवसायाची सुत्रे त्यांच्याकडे सोपवून आपला अधिकचा वेळ अध्यात्मकाकडे खर्च करू लागले. साधू-संतांची सेवा व प्रचंड ज्ञान साधनेच्या आचारणातून त्यांनी समाजात ‘गुरुजी’ ही आदराची पदवी संपादीत केली आणि सर्वजण त्यांना गुरुजी म्हणून संबोधू लागले. सहवासातील प्रत्येकाला सद्गुणाचा ध्यास धरण्याचा त्यांचा आग्रह शेवटपर्यंत राहिला. संयमी स्वभावाचे स्व. किसनलालजी मुनोत यांना चंपावती रत्न सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जीवदया बरोबरच निराधारांना आधार देण्यासाठी त्यांची भूमिका नेहमी अग्रेसर राहिली. ते येथील जैन दिवाकर शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या लिखित इच्छेनुसार त्यांना संथारा व्रत दिले गेले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात दोन बंधू, दोन बहिणी, दिलीप, राजेंद्र, संजय ही तीन मुले, दोन मुली, पत्नी, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.  शुक्रवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थीवदेहावर सकाळी 8 वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किसनलालजी यांच्या निधनाने समाजात, व्यवसायिक, अध्यात्मक क्षेत्रात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मुनोत कुटुंबियांच्या दु:खात दैनिक लोकाशा परिवार व बंब परिवार सहभागी आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!