क्राईम

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरमधील आणखी ९ रूग्ण झाले कोरोनामुक्त,भाजप कार्यकर्त्यांनी रूग्णांवर पुष्पवृष्टी करुन दिल्या शुभेच्छा

परळी । दिनांक १०।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर मधील आणखी ९ रूग्ण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून आज सुखरूपपणे आपापल्या घरी परतले. बऱ्या झालेल्या रूग्णांवर भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून सुक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात भरती झालेल्या रूग्णांची अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे संपूर्ण काळजी घेतली जाते. रूग्णांची तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून दिवसांतून चार वेळेस तपासणी, औषधोपचार, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा यासह त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम हे नित्य नेमाने घेतले जाते. पंकजाताई मुंडे हया दररोज रूग्णांची काळजी योग्य प्रकारे घेतली जावी यासाठी त्यांच्या बारीक सारीक सोयी, सुविधेवर जातीने लक्ष देतात शिवाय कार्यकर्त्यांना तशा सूचनाही देतात. सेंटरमधील सकारात्मक वातावरणामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच पाच पेशंट बरे झाल्यानंतर आज पुन्हा ९ पेशंट कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले.

कोरोनामुक्त रूग्णांवर पुष्पवृष्टी

सेंटरमधून आज कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये ८ पुरूष व एका महिलेचा समावेश होता. अतिशय आनंदाने ठणठणीत बरे होऊन ते सर्व जण आपापल्या घरी परतले. आपला माणूस सुखरूप घरी आल्याचे पाहताच त्यांचे कुटुंबिय आनंदून गेले, त्यांनी पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांचे याबद्दल विशेष आभार मानले. तत्पूर्वी सेंटरमधून परततांना दोन्ही ताईंनी रूग्णांचे अभिनंदन करून त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच काळजी घेण्यासही सांगितले. कार्यकर्त्यांनी देखील गुलाब पुष्प देऊन त्यांचेवर पुष्पवृष्टी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, श्रीराम मुंडे, उमेश खाडे, सचिन गिते, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, मोहन जोशी, गोविंद चौरे, विजयकुमार खोसे आदी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!