मनोरंजन राजकारण

भाजपला मुंबईत धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हेमेंद्र मेहता भाजपच्या चिन्हावर तीनवेळा पूर्वीच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजप पक्ष वाढीसाठी झटणारे नेते अशी हेमेंद्र मेहता यांची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. मेहता यांच्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार विलास पोतणीस, युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या भाजपमध्ये विविध पक्षांतून प्रचंड प्रमाणात इनकमिंग झालं त्याच भाजपमधून आता आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तसंच अलिकडील काळात भाजपमधून काही माजी आमदारांनीही इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!