माजलगाव

मनूर शिवारात बिबट्याचा वावर, शेतमजूर महिला , शेतकरी गावात पळाले, महसूल विभागाने दिली वन विभागाला वर्दी


माजलगाव : प्रतिनिधी
शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मनूर शिवारात शेतात काम करणाऱ्या महिलांना शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान बिबट्या दिसून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली असून परिसरातील शेतकरी, शेतमजूर महिलांनी पळ काढून घर गाठले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महसूल विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाला वर्दी देण्यात आली आहे.
सुमारे एक महिन्यापूर्वी तालुक्यातील सावरगाव शिवारात खराडे यांच्या शेताजवळ उसाच्या रानात एका पाणी देणाऱ्या शेतकऱ्याला बिबट्या आढळून आला होता परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो बिबट्या नसून तडस असल्याचा अंदाज पायांच्या ठस्यावरून काढला होता परंतु त्या नंतर कुठेही बिबट्याचे दर्शन झाले नाही. शुक्रवार दि. 1 रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान येथील मनूर शिवारात महिला मजूर शेतात काम करीत असताना त्यांना बिबट्या आढळून आला. भीतीपोटी या महिलांनी तात्काळ समान सुमान फेकून पळतच घर जवळ केले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्या नंतर इतर शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला शेतमजूर, शेतकरी यांनी घर जवळ करणेच पसंत केले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबीची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर तलाठी, मंडलाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन महसूल विभागाने वन विभागाला याची वर्दी दिल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वन विभागाची टीम परिसरात दाखल झाली असून कोरडवाहू जमिनीत पायांचे ठसे नीट न उमटल्यामुळे वन विभागाचे कर्मचारी अद्याप निष्कर्षा पर्यंत पोंचले नाहीत.
— वैशाली पाटील — तहसीलदार माजलगाव
तलाठी, मंडळाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली असून त्यानंतर वन विभागाला कळविण्यात आले आहे वन विभागाने शहानिशा केल्यानंतर योग्य त्या उपाययोजना संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!