परळी

एसपींचा दणका, 3 कोटी 39 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी माऊली पतसंस्थेच्या 22 संचालकांसह 4 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल


परळी, दि. 8 : परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेत बनावट कर्जप्रकरण करून मोठा अपहार करण्यात आला. याबाबत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मुकर्रमजान पठाण यांनी सातत्याने आवाज उठवला होता. याची दखल नवीन आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी घेऊन बुधवारी रात्री या प्रकरणी 22 संचालकांसह पतसंस्थेच्या चार कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पतसंस्थेत 3 कोटी 39 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. लेखा परिक्षकाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्था ही गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त आहे. या पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जवाटप केले. सभासदांची कर्ज मागणी फाईल नसतानाही बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून कर्ज मंजूर केले तसेच पतसंस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप करून नियमांचे उल्लंघन केले. सभासदांचे एफडी नसताना एफडीवर कर्जवाटप केले. काही सभासदांची एफडीपेक्षा कर्ज आयडीपी कलेक्शनला न पाठविता आयबीपीपोटी रक्कम अदा व संचालकांनी स्वत:च्या नातेवाईकांच्या नावावर एफडीवर कर्ज घेऊन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी यांनी 3 कोटी 39 लाख 42 हजार 601 रुपयांचे कर्जवाटप केले व पतसंस्थेची फसवणूक केली. सदरील हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून याबाबत मुकर्रमजान पठाण यांनी वेळोवेळी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल उपनिबंधकांनी घेऊन काझी ऐहतेशामोद्दीन यांनी याबाबत तपासणी केल्यानंतर पतसंस्थेतील अपहार उघडकीस आला आणि काझी यांच्या फिर्यादीवरून संजय देशमुख, कचरूलाल उपाध्याय, विजय डहाळे यांच्यासह 22 संचालक, 4 कर्मचार्‍यांविरोधात परळीत शहर पोलिस ठाण्यात कलम 402, 506, 409, 462, 468, 470, 471 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान सदर प्रकरणाची पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी तात्काळ दखल घेतली, त्यांच्या आदेशाने सदर प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!