पाटोदा

‘त्या’ नवविवाहितेचा खून, पतीसह सासर्‍यावर गुन्हा दाखल, दिड महिन्यापूर्वी झाले होते लग्न; चारित्र्यावर घेतला संशय


पाटोदा, 3 ऑक्टोंबर : अवघे दिड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याच्या आरोपावरून पती आणि सासर्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पाटोदा तालुक्यातील अंतापूर येथे उघडकीस आली आहे.
संध्या उमेश गाडे (वय 18, रा. अंतापूर, ता. पाटोदा) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील छगन सोपान तोडकर (रा. मंगरूळ, ता. आष्टी) यांनी सांगितले कि, संध्याचा विवाह दिड महिन्यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी उमेश अशोक गाडे याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यापासूनच संध्याचा सासरी छळ सुरु झाला. उमेश चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देऊ लागला. तिच्या वडिलांनी फोन केला तरी तो तिला देण्यास टाळाटाळ करत असे. सोमवारी (दि.28 सप्टेंबर) संध्याचे आई-वडील तिला भेटण्यासाठी गेले असता तिने पतीकडून सतत होत असलेल्या छळाबद्दल त्यांना सांगितले होते. गुरुवारी (दि.01) पहाटे संध्याचा सासरा अशोक रामा गाडे याने तिच्या वडिलांना फोन कारून संध्या बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी (दि.02) सकाळी 8 वाजता त्याने पुन्हा फोन केला आणि संध्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ अंतापूर येथे धाव घेत इतर ग्रामस्थांच्या मदतीने संध्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अंमळनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, संध्याला पोहता येत असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासर्‍याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला अशी तक्रार त्यांनी दिली. सदर तक्रारीवरून उमेश अशोक गाडे आणि अशोक रामा गाडे या दोघांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

बेपत्ता असल्याचा रचला होता बनाव

सासरा अशोक गाडे याने गुरुवारी पहाटेपासून संध्या बेपत्ता झाल्याचा बनाव रचला आणि तिच्या वडिलांनाही तसे सांगितले. संध्याच्या वडिलांनी अंतापूर येथे जाऊन तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे वडील आणि सासरा या दोघांनी अमळनेर ठाण्यात जाऊन संध्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!