माजलगाव, दि.25 ः (लोकाशा न्यूज) : येथील नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्यांनी दहा महिण्याचा थकीत पगारांच्या मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव शहर व 11 गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवर काम बंद पुकारत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे माजलगाव शहर व 11 गावच्या पाणी पुरवठा आजपासून बंद झाला आहे.
माजलगाव व 11 गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवरील सर्व कर्मचार्यांची ऑक्टोंबर 2019 पासून पगार थकीत आहे. परिणामी पाणी पुरवठा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार निवेदने देवूनही थकीत पगारासाठी मुख्याधिकार्यांकडून वेळकाढू धोरण स्विकरले जात आहे. तसेच एप्रिल 2020 रोजी थकीत पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन कर्मचार्यांनी केले होते. यावेळी आठवड्यात तुमचा थकीत पगार देवू असे आश्वासन दिले होते. मात्र याला चार महिणे उलटूनही कर्मचार्यांना पगार देण्यात आला नाही. कर्मचार्यांना वर्षभरापासून पगार नसल्याने त्यांचे संसाराचा गाढा चालवणे कठीन झाले. याकरिता मागील दहा महिण्यापासून पगार तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्यांनी शुक्रवार दि.25 रोजी माजलगाव व 11 गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवर काम बंद पुकारले असून ठिय्या मांडुन आंदोलन सुरू केले आहे. परिणामी आजपासून माजलगाव शहर व 11 गावच्या पाणी पुरवठा बंद झाला आहे. या आंदोलनात पाणी पुरवठा कर्मचारी राहुल शिंदे, संजय वाघमारे, दशरथ पवार, संपत अलकुंटे, शेख जावेद शेख सलिम, करीम देशमुख, राम थोरात, बजरंग पांचाळ, शेख बशिर, पंडित चव्हाण, विशाल टाकणखार, मधुकर जावळे, नरेंद्र पानपट, सचिन शिंदे, असद हमद चाऊस, प्रकाश डोंगरे, गवळण शेंडगे आदी कर्मचार्यांचा सहभाग आहे.