Uncategorized

गणेश विसर्जनानिमित्त आज जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त

शांतता बाळगण्याबरोबरच ठिकठिकाणी गर्दी न करण्याचेही जिल्हा पोलिस दलाचे आवाहन



बीड : जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि स्वाती भोर यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा पोलिस दल अत्यंत प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे. कोरोनाच्या संकटातही जिल्हा पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण जिल्हावासियांसाठी सातत्याने धावून आलेले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात शांतता कायम आहे, ही शांतता कायम रहावी याअनुषंगानेच आज गणेश विसर्जनानिमित्त जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता बाळगावी, तसेच ठिकठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजीही नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गणेश विसर्जन बंदोबस्त निमीत्ताने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला कडक व सक्त सुचना दिल्या आहेत, तसेच जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या काळात तणावपुर्ण वातावरण निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठीच्या सक्त सुचना पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गणेश विसर्जन निमीत्ताने राज्य राखीव पोलीस बल जालना यांच्याकडील 01 कंपनी 3 प्लाटूनमध्ये विभागून 03 ठिकाणी असे 01 अधिकारी व 100 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच 04 आर.सी.पी तुकड्या जिल्ह्यात 4 ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता 02 अपर पोलीस अधीक्षक, 05 पोलीस उप अधीक्षक, 23 पोलीस निरीक्षक, 61 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 74 पोलीस उपनिरीक्षक, 2219 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकुण 168 पोलीस अधिकारी, 2297 पोलीस कर्मचारी, आणि 700 होमगार्ड यांना गणेशोत्सव व मोहरम बंदोबस्त संपुर्ण जिल्हाभर लावण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना सुचना दिल्यानंतर पोलीस उप अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील 06 उपविभागात मुख्याधिकारी, महावितरण, तहसिल, सरपंच, ग्रामसेवक या शासकीय अधिकार्‍यांच्या गणेश विसर्जन योजना निमीत्ताने 06 बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये दि.18 ऑगस्ट 2020 पासून ते आजपावेतो गणेशोत्सव अनुषंगाने शांतता अबाधित राखण्यासाठी 2244 वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व जनतेला आवाहन करण्यासाठी 28 रुट मार्च घेण्यात आले आहेत. तसेच 28 ठिकाणी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक उपविभागात संकलन केंद्रे व गणपती मुर्ती संकलन केंद्रापासून विर्सजन पाईंट पर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. उपविभाग बीड- 30 संकलन केंद्रे, 16 ट्रॅक्टर, माजलगाव उपविभाग – 107 संकलन केंद्रे, 82 ट्रॅक्टर, गेवराई उपविभाग – 47 संकलन केंद्रे, 20 ट्रॅक्टर, अंबाजोगाई उपविभाग – 20 संकलन केंद्रे, 20 ट्रॅक्टर, आष्टी उपविभाग – 05 संकलन केंद्रे , 10 ट्रॅक्टर , केज उपविभाग – 06 संकलन केंद्रे , 07 ट्रॅक्टर , अशी संकलन केंद्रे व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 272 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेश विसर्जन आहे. खोट्या बातम्या, अफवांचे ताबडतोब खंडण करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. अफवा पसरवणार्‍यांवर बीड पोलीसांचा सोशल मिडीया सेल 24 तास करडी नजर ठेवून आहे. तसेच सर्व मुख्य शहराच्या निगराणीखाली आहेत. आज दि.1 सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतुर्दशी दिवशी जिल्ह्यात गणेश विसर्जन होणार आहे. तरी यावर्षी कोव्हिड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसेच सर्व नागरिकांनी कोव्हिड -19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्यासह संपूर्ण पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!