सांगली: कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (वय 54, रा. कडेगाव, जि. सांगली) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याची बतावणी करून हसबनीस यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार 28 वर्षीय पीडित तरुणीने शुक्रवारी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास इस्लामपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला आहे.
कडेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक विपिन हसबनीस हे वर्षभरापूर्वीच कडेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले आहेत. लॉकडाउनच्या काळात कारने कोल्हापुरातून कराडच्या दिशेने जाताना त्यांना कासेगाव बस स्थानकाजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत असलेली तरूणी दिसली. हसबनीस यांनी तरुणीला कराडपर्यंत लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान तिचा मोबाइल नंबर घेतला. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने तिला अभ्यासात मदत करतो अशी बतावणी केली. यानंतर वारंवार फोन करून कडेगाव येथील घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा उल्लेख पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे. हा प्रकार एप्रिल ते जुलै दरम्यान घडला. याबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही हसबनीस याने पीडितेला दिली होती. अखेर पीडित तरुणीने शुक्रवारी सकाळी कडेगाव पोलीस ठाण्यात निरीक्षक हसबनीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास इस्लामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला. दरम्यान, हसबनीस यांच्याशी संपर्क साधला असता, ’संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीत तथ्य नाही. तिने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मागण्या मान्य न केल्यानेच तिने माझ्याविरोधात तक्रार दिली आहे. तपासानंतर योग्य ते समोर येईलच,’ असे त्यांनी सांगितले.