अंबाजोगाई

अखेर स्वाराती’मधील त्या’ पाच डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द, आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश


अंबाजोगाई : येथील स्वामीन रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पाच डॉक्टरांची प्रतिनियुक्ती जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली होती. अंबाजोगाई आणि आजूबाजूच्या तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या निर्णया विरोधात नागरीकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी देखील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि संचालक डॉ. टी.पी. लहाने यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश आले असून सदरील पाचही डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. टी.पी. लहाने यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या कालावधीत स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात येणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या नगण्य होती. याचा आधार घेत येथील 43 डॉक्टरांना मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बीड जिल्ह्यातही कोरोनाचे वेगाने प्रसार झाला आणि स्वाराती’मधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. तरी देखील आणखी पाच डॉक्टरांना जळगावला तर काहींना लातूरला पाठविण्याचा निर्णय घेतला गेला. या प्रतिनियुक्तीला विरोध दर्शवित दोन डॉक्टरांनी राजीनामा दिला. परिणामी, कोरोना कक्षात सर्वाधिक सेवा बजावणार्‍या स्वाराती’च्या डॉक्टरांवरील ताण कमालीचा वाढला होता. त्यामुळे सदर प्रतीनियुकीत रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली. आ. नमिता मुंदडा यांनी डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी संचालक डॉ. टी.पी. लहाने यांच्याकडे आणि वैद्यकीय शिक्षण विभागात जोरदार पाठपुरावा केला. गत आठवड्यात अक्षय मुंदडा यांनी स्वाराती रुग्णालयातील विविध प्रश्नांवर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या सोबत चर्चा केली होती. त्यातही प्रामुख्याने प्रतिनियुक्तीचा मुद्दा चर्चिला गेला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले असून त्या पाचही डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. टी.पी. लहाने यांनी दिले आहेत. स्वाराती रुग्णालयात रुजू होण्यासाठी त्या डॉक्टरांना जळगाव येथून कार्यमुक्त करावे असेही आदेशात नमूद आहे.

यांची झाली प्रतिनियुक्ती रद्द
जळगाव येथील प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या डॉक्टरांमध्ये स्वारातीच्या बधिरीकरण शास्त्र विभागातील डॉ. प्रसाद सुळे, डॉ. गणेश खंदारकर, डॉ. जयेश मोरे, डॉ. राहुल बागुल आणि पल्मोनरी डिसिजेस विभागातील डॉ. प्रविण चेडे यांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!