मुंबई

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी


मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक जारी केलं आहे.
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आधी या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांनी केला. मात्र, आरोपी सापडत नसल्यामुळे गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला. परंतु सात वर्षे पूर्ण होऊनही सीबीआयला खुनाच्या मास्टरमाईंडला शोधण्यात यश येत नसल्याने तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सीबीआयने लवकरात लवकर मुख्य आरोपीला पकडावं, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीय करत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी, पुणे येथे निर्घृण खून झाला. 20 ऑगस्ट 2020 रोजी या घटनेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. खुनानंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासाची अक्षम्य हेळसांड केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. खुनाला सात वर्षे झाल्यानंतरदेखील सीबीआय सारख्या देशातील प्रतिष्ठित तपास यंत्रणेकडून अजूनही खुनाचा तपास पूर्ण झालेला नाही ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे तसंच मे 2019 मध्ये अ‍ॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करुन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर आणि राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉक्टर वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही असे मत मुक्ता दाभोलकर आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरु येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालनुसार डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तुल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झालेली आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता, यावरुन हे खून करणार्‍या गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!