बीड

मुंडे-क्षीरसागर कुटूंबियातील ऋणानुबंध घट्टच ! पंकजाताईंच्या ऐतिहासिक विजयासाठी योगेश क्षीरसागरांची संपूर्ण यंत्रणा ताकतीने कामाला लागली, ताई म्हणाल्या, आगामी काळात डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार



बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : राजकारण आणि समाजकारण करताना मुंडे आणि क्षीरसागर कुटूंबियांतील ऋणानुबंध घट्टच असल्याचे सातत्याने पहायला मिळत आहे. याच ऋणानुबंधामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा आता पंकजाताईंच्या लोकसभेतील ऐतिहासिक विजयासाठी ताकतीने कामाला लागली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या यंत्रणेला काम करण्यास आणखी उर्जा मिळावी, याअनुषंगाने शनिवारी पंकजाताईंनी क्षीरसागर कुटूंबियांच्या घरी सदिच्छा भेट देवून संवाद साधला. माझा डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याशी सुसंवाद असायचा, मुंडे आणि क्षीरसागर कुटुंबियांचे ऋणानुबंध आहेत. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासारखे सुशिक्षित, सुसंस्कृत राजकारणी बीड जिल्ह्याच्या राजकारणात असल्याचा मला आनंद आहे. या निवडणुकीत मला सहकार्य करा, आगामी काळात मी डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठीशी उभी राहणार, असल्याची ग्वाही भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी दिली.
बीड शहरातील क्षीरसागर यांच्या निवासस्थानी पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी (दि.30) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली. स्वागतप्रसंगी पंकजाताई मुंडे या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ.दिपाताई क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, प्रदेश महामंत्री सलीम जहांगीर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाले की, आज स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी आले. 40 वर्ष काकूने राजकीय गड राखला, त्याचा नितांत आदर आहे. काकू रुग्णालयात असताना मी भेटायला गेले होते. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांवर पुत्रवत प्रेम केले. साहेबांचा जयदत्तअण्णांशी थोडा संघर्ष होता, तरीही काकू भेटल्यावर मायेने बोलत. डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष असताना त्यांनी नगरपालिकेतील सभागृहाला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले. हे त्यांनी स्वतःहून केले, याचा मनस्वी आनंद आहे. क्षीरसागर कुटुंबियांशी आमचे अनेक पिढ्यापासून संबंध आहेत. मला निवडणुकीत सहकार्य करा. यापुढे आपण डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहणार आहे, अशी ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या, बीड मतदारसंघात भरीव विकासनिधी दिला आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. विकासाचे राजकारण करण्यावर आपला कायम भर राहिला आहे. मी विरोधकांना देखील निधी दिला. मी केवळ स्व.गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून मतदान देऊ नका. माझे काम पाहून मतदान करा. स्व.केशरकाकू यांनी रेल्वेचा पाया रचला. त्यानंतर खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे कामाला गती दिली, लवकरच रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. मुस्लिम समाजाचे यापूर्वी अनेकदा सहकार्य केले. समाजाचे हे सहकार्य आपण कदापिही विसरू शकत नाही. यापुढेही सहकार्य मिळेल असा विश्वास आहे. जातपात, धर्म सर्वकाही बाजूला ठेवून विकासासाठी मतदान करा. मला जेवढे मते द्याल, ते प्रत्येक मत कर्ज समजून काम करेल. आम्ही दररोज जनमानसात आहोत, आता सर्व मित्र पक्ष ताकदीने सोबत असल्याने आमची ताकद वाढली आहे. आपण नारायण गड ते गहिनीनाथ गडाचा विकास करण्यासाठी भरीव निधी दिला. विकासाचा समतोल राखण्याचा कायम प्रयत्न केला आहे. कुणी मतदान केले, नाही हे कधीही पाहिले नाही. मायनस असलेल्या बुथवर देखील मी निधी दिला, असे मत व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. पंकजाताईंना मताधिक्य देण्याचा पदाधिकार्‍यांनी शब्द दिला. बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्यासह आमचे कार्यकर्ते
ताकतीने तुमचे काम करणार – डॉ.योगेश क्षीरसागर
विकासप्रिय नेतृत्व म्हणून पंकजाताई यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून राज्यात प्रभावी कार्य केले. खासदार म्हणून आपण निवडून येणारच आहात. मुंडे साहेबांकडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री खाते होते. आता पंकजाताईंनी केंद्रात मंत्री होऊन पुन्हा एकदा सत्कारासाठी आमच्या घरी या, अशा शब्दात डॉ. योगेश क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, बीड मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. बीड बायपास, स्लिप रोड, प्रस्तावित रिंग रोड प्रश्न सोडवावा. मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून वॉटरग्रीड योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. खासदार म्हणून आपण निवडून या आणि आम्हाला भरीव निधी द्या. शहरातील मराठा भवनसाठी बीड नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आतापर्यंत आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमची जात पाहिली नाही, अगदी तसेच आमचे कार्यकर्ते देखील तुमचे काम करतील, अशा शब्द डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!