मुंबई| 12 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात काँग्रेस पक्षाला खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशोक चव्हाण नॉटरिचेबल आहेत. अशातच भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्ष प्रवेशाची तयारी सुरु आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.
अशोक चव्हाण नॉट रिचेबल
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या संपर्क होत नाहीये. शिवाय अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु आहे. हा नेता काँग्रेसचा बडा नेता असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाले. भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यलयात दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.