बीड

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल, ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला विश्वास, पंकजाताई मुंडे यांची शरद पवार, साखर संघाच्या अध्यक्षांशी झाली चर्चा, आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे

बीड ।दिनांक २६।
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर येत्या ५ ते ६ जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा झालेली आहे, त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची गरज नाही, निर्णय होईपर्यंत सर्व काही सुरळीत चालू देणार असल्याचे संघटनांनी ठरवले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्यात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या लवादाचे निर्णय दरवर्षी होतात, त्यानुसार साखर संघाबरोबर आमच्या दोन चार बैठका देखील झालेल्या आहेत, या बैठकीचा पंकजाताई मुंडे यांनी पूर्ण आढावा घेतलेला असून ऊसतोड कामगार संघटनांची भेटही घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे.येत्या ५/६ तारखेच्या आसपास यावर निर्णय फायनल होऊन सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.

आताच कोयता बंद करण्याची गरज नाही

५ /६ तारखेच्या बैठकीत जे होईल त्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची आवश्यकता नाही ऊसतोड कामगार व मुकादमांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. ५/६ तारखेपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे. तदनंतर शरद पवार, पंकजाताई मुंडे व साखर संघ संबंधित संघटनांची भेट घेतील आणि पुढच्या गोष्टी ठरवतील असं निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत इतिहासात ऊसतोड कामगारांच्या हिताचाच निर्णय झालेला आहे, गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून हिच पध्दत चालू असल्याने त्याच पध्दतीने यावेळीही निर्णय होईल असा विश्वास ऊसतोड कामगारांना आहे. पंकजाताईंनी देखील ५/६ तारखेच्या आसपास सकारात्मक निर्णय होईल, तोपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे असे सांगितले असल्याचे स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, श्रमिक ऊस तोड कामगार वाहतूकदार संघटना, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर मुकदम व वाहतूकदार संघटना,जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना आदी संघटनांनी निवेदनात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!