बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्याने बीडच्या विद्यार्थ्याकडून 10 लाखांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात समोर आला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण मधुकर कोकणे (रा. हडपसर, पुणे) व अमर सूर्यकांत पौळ (रा. अहमदपूर, लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याने आपला मित्र अमर पौळ यांच्या मदतीने फिर्यादी तरुणाकडून खंडणी उकळली आहे. यश जगदीश जाधव (23) असं फिर्यादी विद्यार्थ्याचं नाव असून तो बीड जिल्ह्यातील शिवाजीनगऱ येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादीस तू आम्हाला पैसे का देत नाहीस. आम्ही तुला पैसे मागतोय हे कळत नाहीये का?, तुला पुण्यात शिक्षण करू देणार नाही. तुला संपवून टाकू अशा धमक्या दिल्या आहेत.