बीड गेवराई

पैठणचा उजवा कालवा फुटला , 14 ठिकाणी लागली गळती

बागपिंपळगाव, गेवराई जवळ पडले भगदाड

गेवराई : पाटबंधारे उपविभाग, गेवराईच्या अंतर्गत येणारा पैठणचा उजवा कालवा बागपिंपळगाव ता. गेवराई जवळ फुटला असून, कालव्या शेजारची जवळपास वीस एकर जमीन पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सदरील कालवा चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने फुटल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित विभाग अद्याप ही झोपेत असून, एक ही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाच्या पाण्याने कालवा गुडघाभर वाहत असून, एका बाजूने कालव्यातून पाझर सुरू आहे. 14 ठिकाणी गळती होत असून , रविवार ता. 12 रोजी एका शेतकर्‍याने दिलेल्या माहितीनुसार घटना उघडकीस आली आहे.
पैठण उजवा कालवा 0 ते 132 किमी असून, हा कालवा गेवराई तालुक्यातून कुरणपिंप्री, मालेगाव, बागपिंपळगाव, कोल्हेर, तलवडा जातेगाव मार्गे माजलगाव डॅमला जाऊन मिळतो. गेल्या काही वर्षापासून कालवा पूर्णत: जिर्ण झालेला आहे. या आधी दोन तीन वेळा कालवा फुटला होता. कालव्याकडे शासनाचे दूर्लक्ष आहे. त्यामुळे, पाणी टेल पर्यंत जात नाही. पाण्याचे आवर्तन पूर्ण होत नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने हा कालवा बागपिंपळगाव ता. गेवराई जवळ फुटला असून, जवळपास वीस एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेत पिके पाण्याखाली आहेत. चौदा ठिकाणी गळती लागली आहे. शेतातले पाणी कालव्यात पाझरून येत आहे. काही ठिकाणी मोठे बोळ पडलेत. धबधब्या सारखे पाणी वाहत आहे. दरम्यान, कालवा फुटून चार दिवस उलटून गेले आहेत. एकही अधिकारी या परिसरात फिरकला नाही. कालवा फुटला, या घटने विषयी शासन व प्रशासन अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे, शनिवार ता. 11 रोजी
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, आमदार लक्ष्मण पवार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे, हे गेवराई तालुक्यात झालेले नुकसानीची पहाणी करण्यासाठी पायपीट करत असताना, सदरील बाब जिल्हाधिकाऱ्यां पासून लपून ठेवण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी या पहाणी दौर्‍यात असताना ही, त्यांनी कालवा फुटल्याची माहाती तालुका प्रशासनाला का कळविली नाही,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!