

परळी । दिनांक ०३।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये आजपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे.
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात शंभर बेड क्षमतेचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. १ मे पासून यासाठी नोंदणी सुरू झाली होती. गेल्या दोन दिवसांत नोंदणी झालेले सुमारे २५ हून अधिक लक्षणे नसलेले कोरोना बाधित रूग्ण सेंटरमध्ये भरती झाले असून तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखीत मोफत औषधोपचार, भोजनासह त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच जेवणाची देखील व्यवस्था सुरू झाली आहे.
सेंटरचे ऑनलाईन उदघाटन
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेस भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंकजाताई व खा. प्रितमताई मुंडे यांनी आयसोलेशन सेंटरचे ऑनलाईन उदघाटन केले. डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. शालिनी कराड,
डाॅ. एल.डी. लोहिया, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. दिपक पाठक, डाॅ. वाल्मिक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे यांचेसह भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस जयश्री मुंडे व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ॲड. अरूण पाठक यांनी केले तर उमेश खाडे यांनी आभार मानले. सेंटरमध्ये काम करणारे सर्व डाॅक्टर्स, परिचारीका, कर्मचारी तसेच सेवा यज्ञात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःची काळजी घेऊन रुग्णसेवा करावी. सेंटरमध्ये आलेल्या रूग्णांची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि त्यांना कोरोना मुक्त करावे अशी सूचना पंकजाताईंनी यावेळी केली.
प्रकृती ठिक नसतानाही रूग्णांसाठी सेवा कार्य!
पंकजाताई व खा. प्रितमताई मुंडे हया दोघीही सध्या कोरोनाने आजारी आहेत, त्यांची स्वतःची तब्येत ठिक नसताना देखील कोरोना बाधित रूग्णांच्या सेवेसाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत आयसोलेशन सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे. स्वतःचा आजार बाजूला ठेऊन त्या सेंटर मधील सर्व बारीक सारीक व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवत असून कार्यकर्त्यांकडून दैनंदिन आढावा घेत आहेत. रूग्णसेवेत कुठेही उणीव भासू नये यासाठी त्या वेळोवेळी सूचना देत आहेत.
••••