मुंबई, (दि. २६) – : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षा विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्याबाबत विनंती केली होती. या मागणीला अवघ्या तासाभरातच सकारात्मक प्रतिसाद देत एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेला धोका, मर्यादित दळणवळण, विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून एमपीएससी मार्फत येत्या २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान ना. मुंडे यांनी केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, परिस्थितीचा व विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी एमपीएससी परीक्षेसाठी धडपड करत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा व हित लक्षात घेत ही मागणी लाऊन धरत यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी ना. मुंडे यांचे व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
जेईई (JEE) व नीट (NEET) पुढे ढकलण्यासाठीही राज्य सरकारने मागणी करावी – धनंजय मुंडे
दरम्यान देशभरातून लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची जेईई (JEE) व वैद्यकीय प्रवेशासाठीची (NEET) परीक्षा सध्याच्या परिस्थितीत घेणे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे ठरू शकते, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या दोन्हीही परीक्षा काही महिने पुढे ढकलाव्यात यासाठी राज्य सरकारच्या वतीने आग्रही मागणी करण्यात यावी अशी मागणीही ना. मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.