माजलगाव ।दिनांक २९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी देत वातावरण ढवळून काढले. सर्वच नेत्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा देत विजयासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांनी पंकजाताईसाठी कठोर मेहनत घेऊ असं सांगत मुंडे साहेबांचं ॠण फेडण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचं माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
पंकजाताई मुंडे यांनी आज माजलगांवचा झंझावती दौरा केला. सकाळी झेंडा चौकातील श्री सिध्देश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली, यावेळी आ. सोळंके व परिवाराने त्यांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, लोकनेते मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मी दोन वेळा आमदार झालो. मुंडे साहेब व प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळे लोकसभा निवडणुक लढलो पण दुर्दैवाने यात अपयश आलं. आता गेल्या अनेक वर्षानंतर मुंडे साहेबांचे वारसदार असलेल्या पंकजाताईंसाठी काम करायची संधी मिळाली आहे, त्यांच्या विजयासाठी जोमाने प्रचार करणार आहे.
प्रकाशदादांशी मैत्रीपूर्ण स्नेह – पंकजाताई
प्रकाशदादा व आमचा पूर्वीपासूनच स्नेह आहे. पहिल्यांदा ते आमदार झाले, त्यावेळी बाबांसोबत त्यांच्या प्रचाराला घरी आले होते. पुण्यात त्यांच्या घरी बरेचदा गेले, आज उमेदवार म्हणून इथं आले, ते मित्र होते, आता मित्रपक्ष झाले आहेत.निवडणूकीत विजयासाठी योगदान द्या अशी विनंती मी त्यांना केली असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या.
कार्यकर्त्यांशी संवाद; नेत्यांच्या भेटी
पंकजाताईनी आजच्या दौऱ्यात भाजपचे बुथ प्रमुख, वाॅरिअर्स, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. विजयासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करून मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. माजी आमदार मोहनराव सोळंके, रमेश आडसकर, मोहन जगताप, माजी आमदार डी के देशमुख, शिवसेनेचे तुकाराम बापू येवले, बाबूराव पोटभरे यांच्याही पंकजाताईंनी भेटी घेतल्या. फिरोज इनामदार यांच्याकडे मुस्लिम बांधवांसोबत इफ्तार पार्टीत त्यांनी सहभाग घेऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते कर्मवीर एकनाथ आव्हाड यांच्या तेलगाव येथील स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष अरूण राऊत, केशवराव आंधळे, प्रवक्ते राम कुलकर्णी आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.