Uncategorized माजलगाव

जि.प.चा उपअभियंता गालफाडे सहा हजारांची लाच घेतांना चतुर्भुज, सिमेंट रस्ता व नालीच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागीतली लाच, एसीबीची चार महिन्यात दुसरी कारवाई, सेवानिवृत्तीसाठी राहिले होते अवघे तीन महिने


माजलगांव, दि. 31 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा उपअभियंता हिरामन गालफाडे यास सिमेंटरस्ता व नालीच्या कामाचे बिल काढण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच घेतांना बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असुन ही कारवाई दिनांक 31 मार्च रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली. या कार्यालयातील मागील चार महिन्यात ही दुसरी कारवाई ठरली आहे.
31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे विविध विभागाअंतर्गत करण्यात येणा-या कामांचे देयके मिळण्यासाठी गुत्तेदार हे सरसावलेले असतात त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात चांगलीच आपाधापी पहावयास मिळते तसेच अधिकारी वर्गासाठी हे कुरण देखील असते. हिंगणी बु. हे गांव माजलगांव येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागा अंतर्गत येते. या ठिकाणी 2515 या शिर्षाखाली मागील काळात सिमेंट रस्त्याचे व नाल्यांचे बांधकाम झालेले आहे याचे देयके अनेकवेळा यातील तक्रारदाराने उपअभियंता हिरामन गालफाडे यांच्याकडे मागीतली परंतु देयके देण्यासाठी 12 हजार रुपयांची मागणी गालफाडे यांनी केली. त्यावर तक्रारदार आणि गालफाडे यांच्यात सेटलमेंट होवुन 6 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराला पैसे देण्यासाठी येथील जिल्हा परिषद बांधकामच्या कार्यालयात गालफाडे याने बोलावले असता येथे सापळा रचुन बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डी.वाय.एस.पी. बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात विजय बनकडे, अमोल बागलाने, सखराम घोलप आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे हिरामन गालफाडे याला सेवा निवृत्त होण्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी राहिलेला होता त्यामुळे शेवटचा हात मारण्याच्या नादात सगळेच गमावुन बसल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत होती.

चार महिन्यांपुर्वी बहिर अडकला होता जाळयात
याच कार्यालयात उपअभियंता असलेला बहिर हा देखील लाच स्विकारतांना केवळ चारच महिन्यांपुर्वी अडकला होता त्याने देखील कामाचे बिल काढण्यासाठीच लाच मागीतली होती त्यामुळे येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाला भ्रष्टाचाराची दिमक लागली की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!