माजलगाव.दि.२७—-राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याला अभूतपूर्व विकास निधी मिळवून दिल्यामुळे बीड जिल्ह्याचा चेहरा बदलला आहे,त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात गावोगावी विकासाची गंगा पोहोचल्याने ग्रामीण भागात भौतिक विकास कामांसह आधुनिक विकासाची दर्जेदार कामे होत असल्याचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.
माजलगाव तालुक्यातील राजेगाव,माली पारगाव,मनूरवाडी,ढोरगाव येथे विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भाजप नेते रमेशराव आडसकर,मोहन जगताप,बबन बाप्पा सोळंके,डॉ.अशोक तिडके,ज्ञानेश्वर मेंडके,दीपक मुंडे,शरद यादव यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन आणि भूमिपूजन केल्या नंतर उपस्थित ग्रामस्थांना खा.प्रितमताई मुंडे यांनी संबोधित केले.बीड जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पंकजाताईंनी अभूतपूर्व असा विकासनिधी मंजूर केला आणि अनेक योजनांच्या माध्यमातून श्वाश्वत विकास कामे ग्रामीण भागात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार,जनतेतून सरपंच अशी अनेक निर्णय घेऊन पंकजाताईंनी राजकारणाची परिभाषा बदलल्याची भावना देखील यावेळी खा.प्रितमताईंनी व्यक्त केली.
यावेळी राजेगाव,माली पारगाव,मनूरवाडी,ढोरगाव येथील सरपंच,ग्राम पंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ठिकठिकाणी खा.प्रितमताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.तसेच माता भगिनींनी औक्षण करून आनंद व्यक्त करत त्यांच्याशी संवाद देखील साधला.