Uncategorized

लष्कराच्या जमिनीचा बेकायदेशीर फेर अखेर रद्द; तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचा घोळ 

​उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ः जमीन केली होती दुसऱ्याच्या नावे

​ अंबाजोगाई (बीड) : शहरातील सर्वे नंबर (५९२) मधील ११ हेक्टर २२ आर. शेतजमीन शासनाच्या मालकीची असताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने संगनमत करून त्याचा दुसऱ्या व्यक्तींच्या नावे फेर केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी हा फेरफार (क्रं.२९४९७) रद्द करण्याचे आदेश सोमवारी (ता. पाच) दिले. त्याची नोंद अंबाजोगाई सज्जाच्या तलाठी यांनी अधिकार अभिलेख्यामध्ये घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.​ शहर परिसरातील सर्व्हे नंबर (५९२) हा भाग शासकीय अध्यापक महाविद्यालय, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, शासकीय प्रेक्षागृह इमारत, शासकीय निवासस्थान इमारत, सुरक्षा रक्षक कर्मचारी वसाहत, हे एकूण क्षेत्र १३ हेक्टर ४२ आर इतके आहे. हे क्षेत्र निजामकाळापासून अभिलेखात ‘फौज निगराणी तामिरात’ या नोंदीखाली म्हणजेच ही जमीन लष्कराच्या ताब्यातील आहे. ही जागा सैन्य दलाने पाच फेब्रुवारी २०१६ ला जिल्हाधिकारी व शासनाच्या मदतीने मोजून घेतली होती; तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व जमीन लष्कराकडे असल्याची नोंद आहे. ​ असे असतानाही येथील तत्कालीन तलाठी सचिन केंद्रे व व मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर यांनी यातील ११ हेक्टर २२ आर (२८ एकर) शेतजमीन क्रमांक (२९४९७) इतर फेरफार ता. २८ एप्रिल २०२० रोजीचे दुरुस्ती फेरफार पत्राचा आधार घेत अमित मुथा, उगमाबाई मुथा, कमल संचेती, कांचनबाई बोथरा, ज्योत्स्ना मुथा, ज्योती मुगदिया, प्रकाश मुथा, प्रमोद मुथा, प्रेमचंद मुथा, ललित मुथा, विजय मुथा, विनोद मुथा, शोभा सुखानी, सुमित मुथा, संतोष मुथा, दीपक मुथा यांच्या नावे केली होती. या प्रकाराची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख, अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाने सदरील शेतजमीन ही ‘फौज निगरानी तामिरात’ लष्काराच्या मालकीची असताना या जमिनीची नोंद व्यक्तींच्या नावावर खासगी स्वरुपात कशी काय झाली? याची पडताळणी करून या संबंधीचा अहवाल महसूल विभागाला दिला.

​ उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिलेल्या अहवालात ११ हेक्टर २२ आर क्षेत्राची झालेली नोंद बेकायदेशीरपणे प्रमाणित केलेली आहे. जिल्हाधिकारी बीड व लष्कर विभागाची परवानगी नसताना झालेला फेरफार शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून तसेच शासनाचा नजराना बुडवून तयार करण्यात आलेला आहे. जागेची नोंद घेतांना आंध्र प्रदेश सर्कल सिव्हिल कोर्ट कंपाऊंडचे डिफेन्स इस्टेट ऑफिसर यांची परवानगी अथवा संमती न घेता सातबाराच्या उता-यावर बेकायदेशीरपणे फेरफार नोंद क्रमांक २९४९७ अन्वये संतोष मुथा व इतर नावे यांची महसुली दफ्तरी दाखल केली आहे. सदरील जमीन शासकीय असल्यामुळे झालेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचे पत्र भूमिअभिलेख यांनी जिल्हाधिकारी बीड यांना पाठवले होते. दरम्यान, फेरनोंद घेणारे तत्कालीन तलाठी सचिन केंद्रे व तत्कालीन मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर हे दोघेही निलंबित आहेत. 

​ सुनावणी घेऊन फेर रद्द 
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी या फेरला स्थगिती देऊन तीन सुनावण्या घेतल्या, सर्व बाजूंचे अहवाल मागवून म्हणणे ऐकून घेतले. पडताळणी अंती त्यांनी हा फार रद्द करून, राज्य शासन महसूल व वनविभाग यांच्या परिपत्रक क्रमांकानुसार ‘भारत सरकार संरक्षण मंत्रालय’ अशी नोंद तलाठी यांनी तत्काळ अधिकार अभिलेख्यात घ्यावी असे आदेश त्यांनी काढले. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!