Uncategorized महाराष्ट्र

दुर्गाष्टमी पर्यंत कोयत्याला न्याय मिळेल ; अन्यथा ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील !

पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना दिला विश्वास ; संपाची पुढील दिशा केली स्पष्ट

मुंबई दि.१७—– ऊसतोड मजुरांच्या कोयत्याला येत्या दुर्गाष्टमी पर्यंत निश्चित न्याय मिळेल असा ठाम विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ऊसतोड मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.दुर्गाष्टमी पर्यंत मजुरांच्या कोयत्याला सन्मानजनक न्याय मिळाला नाही तर ऊसतोड कामगार आक्रमक होऊन दुर्गेचा अवतार घेतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

शुक्रवारी मुंबईत विविध वृत्तवाहिन्यांशी पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यात सध्या सुरू असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत यावेळी त्यांनी पुढील दिशाही स्पष्ट केली.

राज्यातील ऊसतोड मजूरांचा दरवाढीचा करार संपला असल्याने दरवाढ आणि अन्य विविध मागण्यांसाठी सध्या त्यांचा संप सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कोयता म्यान ठेवण्याचा निर्णय कामगारांनी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेतला असून संप कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की “ ऊसतोड कामगारांनी दरवाढीसाठी संप सुरू केला आहे. दुर्गाष्टमी पर्यंत ऊसतोड मजुरांना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. यापूर्वी साखर संघासोबत ज्या बैठका झाल्या, त्यात याविषयी मी आग्रही भूमिका मांडली आहे तथापि, दुर्गाष्टमी पर्यंत मजुरांना न्याय मिळाला नाही तर ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील”.

ऊसतोडणी मजुरीत वाढ व्हावी तसेच अन्य विविध मागण्यांसाठी ऊसतोड मजूर संपावर असले तरी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर मजूर आक्रमक होतील असे सांगताना पंकजाताई मुंडे यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!