देश विदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन


दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. 84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांकडून अथक प्रयत्न, देशभरातून प्रार्थना होत असूनही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. 10 ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते 1969 पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. 1973 मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. 1982 ते 84 या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. 1980 ते 1985 या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र 1989 नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. 1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. 2004 मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. 2012 ते 2017 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!