परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी ( दि.25 ) राष्ट्रीय आरोग्य अभियानाची ऑनलाइन आढावा बैठक घेतली.जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती जाणून घेताना त्यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिल्या. कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.या निधीचा योग्य व्यय होता आहे का याची माहिती घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी परीक्षांची वाट न बघता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सना सेवेत रुजू करून घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच प्रशासन व आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टर्स व रुग्णालयांचे सहकार्य मिळवण्यासाठी खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण न करता त्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन तज्ञ सेवा घेण्याचा विचार मांडला.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभाग व कोविड योद्धयांच्या कामाचे कौतुक केले.