मुंबई, दि.21 (लोकाशा न्युज) ः करोना संकटामुळे जनजीवन कोलमडून गेलं असून, सण उत्सवांवरही मर्यादा आल्या आहेत. करोनाचा शिरकाव झाल्यापासून प्रत्येक सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जात आहे. विशेष गर्दी टाळण्याच्या उद्देशानं प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरूवात झाली असून, मंदिरं उघडणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे. करोनाच्या प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्या जैन बांधवाच्या पर्युषण पर्वाला सुरूवात झाली असून, या काळात मुंबईतील जैन मंदिर खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी मंदिर खुली करण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयानं मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस मंदिरं उघडण्यात येणार आहे. २२ व २३ ऑगस्टला मंदिरं खुली राहणार आहेत. मंदिरं खुली केल्यानंतर केंद्र सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.