‘
अंबाजोगाई ।दिनांक २९।
लोकनेते मुंडे साहेबांनी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते आपल्यातून अचानक निघून गेले आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. पालकमंत्री असतांना जिल्हयात खूप काम केलं, आता पुन्हा एकदा ती संधी मिळण्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असा एखादा मोठा उद्योग व्हावा, कॅन्सर रूग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, चांगलं मेडिकल काॅलेज व्हावं अशी माझी इच्छा आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी विकासाची ब्ल्यू प्रिंटच व्यापारी बांधवांसमोर सादर केली.
पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शहरातील व्यापारी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंद देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, पुरूषोत्तम भन्साळी, भूषण ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, बीड जिल्हयातील व्यवसाय वाढवायचा असेल तर अगोदर काही गोष्टी प्राधान्याने करणं आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन मी पालकमंत्री असताना जिल्हयात रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी योजनेतून मोठया प्रमाणात कामं केली, कायदा सुव्यवस्था राखून व्यापा-यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. अशक्य असलेल्या रेल्वे प्रकल्पाला गती आणली. सुमारे दहा हजार कोटीचे रस्ते दिले. जी काही काम केली त्याची उदघाटन प्रीतमताईना करायला लावली. कुणाचा एक कप चहा घेतला नाही. विकासात कधी भेदभाव केला नाही. परळी विधानसभेत पराभव झाला पण मी खचून गेले नाही, पुन्हा काम सुरू केलं. लोकनेते मुंडे साहेबांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करायची संधी तुमच्यामुळे आता मिळेल याची मला खात्री आहे.
तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज
राजकारणात आज क्षणाक्षणाला बदल घडत आहेत. राजकारण डायनामिक होत चाललं आहे. सध्या तरी मी निवडणूकीची अर्धी लढाई जिंकली आहे, तथापि सर्वांनी योगदान दिलं तर ही निवडणूक सोपी होऊ शकते. मला दिलेलं आपलं प्रत्येक मत हे माझ्यावर तुम्ही ठेवलेलं कर्ज आहे असं समजा. हे कर्ज विकासाने फेडल्याशिवाय राहणार नाही हा माझा इतिहास आहे, मला आपला आशीर्वाद आणि साथ द्या असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमास शहरातील व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.