बीड

दिव्यांग तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधनांचे नि:शुल्क वितरण, रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार केज आणि बीड तालुक्याचे वाटप

बीड । दि.२२ ।
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना येत्या रविवारी ( २४ सप्टेंबर ) सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी २३ मे ते ०२ जून दरम्यान तालुकानिहाय मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण अठराशे ऐंशी लाभार्थी तपासणी शिबिरात पात्र ठरले आहेत. रविवारी दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीड शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील माँ वैष्णोदेवी पॅलेस इथे केज आणि बीड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना निःशुल्क सहायक साधनांचे वितरण करण्यात येणार आहे.

केज आणि बीड तालुक्यातील लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे ; गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन

कानपूर येथील केंद्र सरकारची कृत्रिम अंग निर्माण संस्था ‘एलिम्को’ पहिल्या टप्प्यात बीड आणि केज तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी सहायक साधनांचा पुरवठा करणार आहे, उर्वरित तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांचे साहित्य लवकरच उपलब्ध होणार असून साहित्याच्या उपलब्धतेनुसार तालुकानिहाय वितरण केले जाणार आहेत. सद्यस्थितीत बीड आणि केज तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना सहायक साधनांचे वितरण करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांना निःशुल्क साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने संपर्क केला जातो आहे. बीड शहरातील माँ वैष्णोदेवी पॅलेस इथे होणाऱ्या वितरण सोहळ्यास उपस्थित राहून लाभार्थ्यांनी निःशुल्क साहित्य घ्यावे,तसेच लाभार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत आणावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!