बीड

जिल्ह्यातील घरकुलांची कामे रखडता कामा नयेत, कामे गतीने पुर्ण करा, झेडपी अध्यक्षांच्या प्रशासनाला सुचना, पाणी पुरवठ्यासह झेडपीच्या नव्या ईमारतीचाही शिवकन्या सिरसाट यांनी घेतला आढावा



बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : मागील दोन वर्षांपासून संपूर्ण भारताला कोरोनाने घेरलेले आहे. यामुळे विकासाच्या कामाला चांगलीच खिळ बसली आहे, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती जरा नियंत्रणात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील घरकुलांची कामे रखडता कामा नयेत, घरकुलांची कामे गतीने पुर्ण करा, अशा सुचना झेडपी अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच त्यांनी काल जलजिवन मिशनसह झेडपीच्या नव्या ईमारतीच्या कामाचाही आढावा घेतला, विशेष हेही कामे गतीने पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
सोमवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळ बीडची बैठक जिल्हा नियामक सभागृहात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नियामक मंडळ समितीचे सदस्य म्हणून आमदार सुरेश आण्णा धस उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती शिवकन्याताई सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी प्रकल्प संचालक वानखेडे, समाजकल्याण विभागाचे मढावी, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत सिरसाट यांनी रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेतील सर्वच घरकुलांचा आढावा घेतला, कोरोनामुळे घरकुलांची कामे रखडलेली आहेत. ती आता गतीने पुर्ण करावीत, ज्याठिकाणी अडचणी येतील त्या आम्हाला निश्‍चित कळवाव्यात, त्या तात्काळ सोडविल्या जातील, असा विश्‍वास देत सन 2021-22 या वर्षातील घरकुलांचे प्रस्तावही सरकारला तात्काळ सादर करण्याच्या सुचना यावेळी सिरसाट यांनी प्रशासनाला दिल्या. याचबरोबर काल झेडपी अध्यक्षांनी जलजिवन मिशनचाही आढावा घेतला. पाणी पुरवठ्याच्याही योजना गतीने पुर्ण कराव्यात असे आदेश त्यांनी यावेळी दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे, झेडपीच्या नव्या ईमारतीच्या बांधकामाचाही आढावा यावेळी सिरसाट यांनी घेतला, कोणत्याही परिस्थितीत नव्या ईमारतीचे काम गतीने पुर्ण करावेत, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकारी आणि संबंधित गुत्तेदाराला दिले. यावेळी बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, सीईओ अजित कुंभार, अतिरिक्त सीईओ आनंद भंडारी, कार्यकारी अभियंता हळीकर, इंजिनिअर चाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!