बीड

दाम दुप्पटचे आमिष देऊन 99 जणांना फसवले, अखेर मेरिट लँडमार्क कंपनीवर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल

बीड : प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम जमा करत जा, पाच वर्षानंतर रक्कम दुप्पट करुन देवू अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देवू असे आमीष दाखवून मेरिट लँडमार्क या कंपनीने ९९ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला . शनिवारी बीड शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील जालना रोड भागात मेरिट लँडमार्क या कंपनीने २०१४ मध्ये कार्यालय थाटले होते . या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकीवर चांगले व्याज देण्याचे अथवा पुण्यात प्लॉट किंवा फ्लॅट देण्यात येईल असे सांगण्यात येत होते . त्यावर विश्वास ठेवत बीड जिल्ह्यातील अनेकांनी गुंतवणूक केली . त्यानंतर २०१७ मध्ये हे कार्यालय बंद करण्यात आले . पुढे अनेकांनी पुणे येथे जावून नियमीतपणे रक्कम जमा केली . कालावधी पुर्ण झाल्यानंतर गुंतवूणकदारांनी कंपनीकडे रक्कम अथवा प्लॉटची मागणी केल्यानंतर त्यांनी सध्या कोरोना लॉकडाऊन असल्याचे कारण पुढे केले . दरम्यानच्या काळात या कंपनीचे चेअरमन , संचालक यांचे मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने गुंतवणुकदारांनी पुण्यात धाव घेतली असता तेथे कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदार भाऊसाहेब बापुराव गळगटे ( रा . हरिनारायण आष्टा , ता . आष्टी ) यांनी बीड शहर पोलिस ठाणे गाठत मेरिट लँडमार्क , पुणे या कंपनीचे चेअरमन महेश प्रकाश मुंगसे , संचालक सुरेश भानुदास जाधव , किरण प्रकाश आटपालकर , महादेव विश्वनाथ साळुके ( रा . पुणे ) यांच्या विरोधात ९९ जणांची ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दिली . त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पीएसआय गिरी हे करीत आहेत .

पुण्यातही गुन्हे दाखल
या कंपनीने बीडबरोबरच पुण्यातही अनेकांकडून पैसे जमा केलेले आहेत . परंतु ते वेळेवर परत न केल्याने पुणे शहरातही या कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . संचालक बेपत्ता असल्याने गुंतवणूकदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

बीडकरांचा पुण्याकडे ओढा
बीड शहर व जिल्हाभरातून पुण्याला नोकरी , व्यवसायानिमित्त जाणान्यांची संख्या मोठी आहे . साहजिकच या शहरात आपले हक्काचे घर असावे असे अनेकांना वाटते . याचाच फायदा घेत मेरिट लँडमार्क कंपनीने बीडमध्ये कार्यालय थाटत अनेकांना गंडा घातल्याचे आता समोर आले आहे . मेरिट लँडमार्क कंपनीने त्यांची उस्मानबााद , बार्शी तसेच कोकणात जमीन असल्याचे सांगितले होते . तसेच पुण्यात चाकणजवळ प्लॉट आणि फलॅट असून गुंतवणूकीनंतर ते दिले जातील असे म्हटले होते . त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही गुंतवणूक केली . परंतु आता कोणाशीही संपर्क होत नाही,गुंतवणूकदार भाऊसाहेब गळगटे म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!