अंबाजोगाई

व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का? आ.सतीश चव्हाण यांचा खोचक सवाल, अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रूग्णालयातील व्हेंटिलेटरही तशीच पडून


औरंगाबाद – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास पीएम केअर फंडातून देण्यात आलेली ज्योती सीएनसी कंपनीचे 25 व्हेंटिलेटर तांत्रिक दुरूस्तीअभावी अद्यापही तशीच पडून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 मे रोजी पीएम केअर फंडातून राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश दिले होते. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. केंद्र सरकार व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यावर करणार का? असा खोचक सवाल आ.सतीश चव्हाण यांनी फेसबुक, टिट्‌वरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून विविध राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरसंदर्भात अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची दखल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागली. सदरील व्हेंटिलेटरचे ‘ऑडिट’ करण्याचे निर्देश देखील त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची अद्यापही दखल घेतलेली दिसत नाही. पंतप्रधानाच्या आदेशाला जर ‘केराची टोपली’ दाखवली जात असेल तर सर्वसामान्य लोकांनी पंतप्रधान म्हणून आपल्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा ठेवायची असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आ.सतीश चव्हाण यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास मिळालेल्या व्हेंटिलेटरची माहिती घेतली असता या रूग्णालयास पीएम केअर फंडातून ज्योती सीएनसी कंपनीचे 25 व्हेंटिलेटर प्राप्त झाले. मात्र सदरील व्हेंटिलेटरमधून रूग्णासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने हे व्हेंटिलेटर मिळाल्यापासून तशीच बंद अवस्थेत पडून असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
सदरील रूग्णालयाच्यावतीने कंपनीला या व्हेंटिलेटरची तांत्रिक दुरूस्ती करून देण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र कंपनीकडून रूग्णालयास अद्यापही काहीच उत्तर मिळाले नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. वेळेवर ‘सर्व्हीस’ देता येत नसेल तर कंपनीने व्हेंटिलेटरचा पुरवठा करणे बंद करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!