मराठवाडा

मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडा -विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचे आदेश


औरंगाबाद, दि.26 : औरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 ची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.
चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. केंद्रेकर बोलत होत. यावेळी निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपायुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. केंद्रेकर म्हणाले, मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे अचूकपणे मतमोजणी प्रक्रियेत पालन करावे. मतमोजणी प्रक्रियेत अचूकता, गती याचा विचार करावा. प्रशिक्षणात शंकांचे निरसन करून घ्यावे. निवडणूकसंबंधी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक व अचूकरित्या पार पाडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
प्रशिक्षणात पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांनी मतमोजणी प्रक्रिया : कार्यक्रम पत्रिका, कामनिहाय विभागणी व नियुक्त अधिकारी यांची कर्तव्ये, मतमोजणी प्रक्रिया वैध, अवैध मतपत्रिका संबंधी तरतुदी, त्यांची उदाहरणे, मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणीची दुसरी व त्यापुढील फेऱ्यांसंबंधी कायदेशीर तरतुदी, मतमोजणी प्रक्रिया नि:शेषीत (एक्जॉहस्टेड) मतपत्रिकेची उदाहरणे याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.
चित्रफितीचे निवडणूक निरीक्षकांकडून कौतूक
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांच्या संकल्पनेतून निवेदिका, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या वतीने ‘डमी मतमोजणी केंद्रातील मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तयार करण्यात आलेली चित्रफित’ प्रशिक्षणात दाखविण्यात आली. या चित्रफित निर्मितीसाठी महसूल उपायुक्त पराग सोमण, पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी आणि अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या या चित्रफितेचे कौतूक निवडणूक निरीक्षक बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी केले. चित्रफित निर्मितीत यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचाही सहभाग आहे.


लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!