अमेरिका, दि. ६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला आहे. जॉर्जिया आणि मिशिगन या दोन्ही राज्यातील कायदेशीर लढाईत त्यांचा पराभव झाला आहे. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत पिछाडीवर पडत असल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी कोर्टात धावही घेतली.पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली आहे. या दोन्ही राज्यात ट्रम्प आणि बायडेन यांच्यात अटी-तटीची लढाई होती. आता ट्रम्प यांनी नेवाडा येथील मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
नेवाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होटस आहेत, सध्या बायडेन यांच्याकडे २६४ इलेक्टोरल व्होटस आहे. विजयासाठी त्यांना फक्त सहा मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे नेवाडामधली सहा इलेक्टोरल व्होटस त्यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरु शकतात. जॉर्जियाच्या प्रकरणात ट्रम्प यांच्या प्रचार टीमने ५३ उशिरा आलेले बॅलेट्स ऑन टाइम बॅलेट्समध्ये मिसळल्याचा आरोप केला होता.मिशिगनमध्ये ट्रम्प यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. अमेरिकेतील न्यायाधीशांनी गुरुवारी ट्रम्प यांचे हे दोन्ही दावे फेटाळून लावले. ज्या बॅलेट्स प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय, ते अनधिकृत असल्याचा कोणाताही पुरावा नाही असे जॉर्जियामधील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स बास म्हणाले. नेवाडाच्या क्लार्क काऊंटीमध्ये मतदाना गडबड झाल्याचा आरोप ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेत मंगळवारी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान झाले. दुसऱ्या दिवशी बुधवारपर्यंत निकाल अपेक्षित होता. पण अजूनही मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. कदाचित पुढच्या आठवडयातही निकाल लागू शकतो. ट्रम्प आणि बायडेन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. काही राज्यामध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थक भिडल्याच्याही बातम्या आहेत.