मुंबई, 22 सप्टेंबर : येत्या 24 तासांत राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर व सातारा येथे आजचा दिवस हा अति मुसळधार पावसाचा असणार आहे. याशिवाय पालघर, मुंबई, ठाणे येथे 22 सप्टेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही कमी-जास्त प्रमाणात पावसाची रिमझिम सुरू असणार आहे. पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी मुंबई ठाणे सातारा कोल्हापूर रायगड, पुणे जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे. मुंबई-ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पुण्यासह राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुणे शहरात तर दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसू लागल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीपात्रात पुन्हा पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणात पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे.