दिल्ली, दि. २० (लोकाशा न्यूज) : आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात दोन तरुण भारतीय कर्णधार समोरासमोर येणार आहेत. श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स आणि लोकेश राहुलचा किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. परंतू यंदाचा संपूर्ण हंगाम हा युएईत होणार असल्यामुळे प्रत्येक संघाला विजयाची समान संधी असल्याचं मानलं जातंय. दिल्लीने आपल्या संघात अपेक्षेप्रमाणे अजिंक्य रहाणेला बाहेर बसवलं आहे. याचसोबत अमित मिश्रालाही संधी देण्यात आलेली नाही. याऐवजी स्टॉयनिसला संघात जागा मिळाली आहे. इशांतच्या अनुपस्थितीत नॉर्टजे आणि रबाडा यांच्या खांद्यावर दिल्लीच्या आक्रमणाची भिस्त असणार आहे. तर दुसरीकडे पंजाबने अनुभवी आणि तरुण खेळाडूंना समाध संधी देण्याचा प्रयत्न केला. विंडीजचा जलदगती गोलंदाज शेल्डन कोट्रेल यंदा शमीसोबत पंजाबच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे.