मुंबई, दि. 6 : राज्यातील ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या मजूरीत दरवाढ करण्यासंदर्भात लवकरच लवादाच्या बैठकीत आग्रही चर्चा करणार आहे, कोयत्याला नक्कीच न्याय मिळेल कामगारांनी विश्वास ठेवावा असा शब्द पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ऊसतोड कामगार व साखर कारखानदार यांच्यातील लवादाचे कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासमवेत आपली चर्चा झाली असून बैठकीतून मार्ग निघेल असे त्या म्हणाल्या. ऊसतोड कामगार व मुकादम यांच्या हक्कासाठी लवकरच लवादाच्या बैठक होणार असून त्यात आपण आग्रही चर्चा करणार असल्याचे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. ऊसतोड कामगारांना त्यांच्या मजूरीच्या दरात न्याय वाढ मिळावी यासाठी वर्षानुवर्षे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी लढा दिला होता. त्यावेळी मुंडे साहेब व शरद पवार यांचा लवाद होता आणि आता त्या लवादावर जयंत पाटील व मी आहे. ऊसतोड कामगारांनी फार मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आपण 2015 मध्ये व पुन्हा 2018 मध्ये अंतरिम वाढ मिळवून दिली होती. याशिवाय कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मध्यंतरी ऊसतोड कामगारांना कोरोना बाधित वेगवेगळ्या भागातून आपापल्या घरी पोहोचविण्यासाठी सुद्धा सन्माननीय नेत्यांनी तेव्हा चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, यासंदर्भात झालेल्या निर्णयामध्ये त्यावेळी त्यांनी तत्परता दाखवल्यामुळे ऊसतोड कामगारांना सहकार्य मिळालं होतं. आतासुद्धा ते ऊसतोड कामगारांना सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर आपण देत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.