मुंबई

पुढच्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार -डॉ. तात्याराव लहाने

कोरोनाचा आजार अंगावर काढू नका, तात्काळ उपचार घेण्याचे केले आवाहन

मुंबई, दि. 13 : कोरोनाचा आजार अंगावर काढू नये, अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन हा आजार जीवावर बेततो असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला.
सप्टेंबरपासून राज्यात हा आजार कमी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन’ फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. आरोग्य सेवांची भूमिका’ या विषयावर डॉ. लहाने यांनी व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ते म्हणाले, कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावीपणे कशी कार्यरत होते ते आपण अनुभवत आहोत. लॉकडाऊनचा निश्चितच मोठा उपयोग झाला. यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन कोरोना चाचणी करणार्‍या प्रयोगशाळा होत्या. तीन वरून आता ही संख्या 144 प्रयोगशाळा पर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या 71 खाजगी प्रयोगशाळा असून उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची मोफत चाचणी केली जाते. सध्या कोरोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये पाय पसरत आहे. यामुळे त्यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून कोरोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मकरित्या पडत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिलासादायक बाजू देखील त्यांनी यावेळी सांगितल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!