कडा दि. 11 (लोकाशा न्यूज) ः परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अनिश्चित काळासाठी कडा कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करुन लग्न लावणा-या वधू , वर पित्यासह सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कडा परिसरात मागील काही आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आता १७ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कडा कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही एका सुशिक्षित वर पित्याने आपल्या मुलाचा विवाह मंगळवारी आयोजित केला होता. त्यामुळे बीड येथील वधू,तिचे आई-वडील आणि वरासह त्याचे आई-वडीलांच्या विरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरु असताना पोलिसांना माहिती न देता विनापरवाना लग्न लावल्याबद्दल सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.